Namaskar mitrano,
Marathi chat madhe aaple swagat aahe, kahi lokanchi complaint aahe ki tyana chat box disat nahi, tar sarvani lakshadya ki tumchyakade Flash player installed aahe ani tumhi Mozilla Firefox use karat aahe, karan baki sarva browser madhe chat box cha problem aahe.........

Dhanyavad

न सुचलेली कविता !!

Posted on Sunday, May 24, 2009 by Ajit


प्रतिभेचे देणे कोटी योजने दूर...
सरस्वतीचा वरदहस्त माझ्यावरून फारसा फिरत नाही.
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!

ओलाचिंब पाऊस खिडकीत कोरडा राहून बघतो मी.....
सकाळचे कोरडे उन देखील छत्रीखालून झेलतो मी...
अरसिकतेवर चिडून माझ्या , वारा चौफेर उधळतो पाने...
वादळ मनात कितीही उठले , तरी होत नाही त्याचे गाणे.
जाणवते आत आत ,खोलवर खूप काही.....
पण कागदावर मात्र काहीच उतरत नाही!
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!

मैफिल कितीही रंगो ...शब्दांचे जाम भरून फक्त पितो मी..
चढते शब्दांचीच नशा ..त्यात शब्दांनाच शोधतो मी...
अबोल आणि धुंद मनाला , देतो हलके मंद मंद हेलकावे..
जरा घसरतो मीच कुठेतरी..आणि उडून जातात शब्दांचे रावे.
अव्यक्त उस्फुर्त मनाची होते लाही लाही...
पण कागदावर मात्र काहीच उतरत नाही!
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!

तोच चंद्र अन त्याच चांदण्या ,रोज रोज पाहतो मी..
बागेतल्या लाजरीलाही गुलाबाबरोबरच पाणी घालतो मी!
उसन्या अवधानाने, जगतो जीवनाचे ह्या सोहळे...
चुरगळून, फाडून फेकतो अव्यक्त भावनांचे बोळे !
स्मरणाची नकोशी नोंद ..अन विसरण्याची केवढी ही घाई..
पण कागदावर मात्र काहीच उतरत नाही!
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!

नशीब एवढेच की कळत नसली तरी, कविता वेड्यासारखी जगतो मी..
.कवितेचं अजीर्ण झालं की, कविताच औषध म्हणून पितो मी!
क्षणात सुचले कवीला जे ते युगायुगानी मला समजते...
सुचल्या काव्याची वेदना रात्रंदिवस मला छ्ळते..
हुरहूर लागे मनाला नी उगाच झरते शाई..
पण कागदावर मात्र काहीच उतरत नाही!
लिहिण्याचे भाग्य तर सोडा,..
कविता मला फारशी समजत देखील नाही!
... गौरी


|